Sunday, 27 April 2025

विकास सहयोग प्रतिष्ठान – परिवर्तनाची मशाल!

(३० वर्षांचा प्रेरणादायी प्रवास)

विकास सहयोग प्रतिष्ठान या संस्थेला दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी तीस वर्षे पूर्ण झाली. या तीन दशकांचा प्रवास आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा विषय आहे. एका वाक्यात सांगायचं तर आम्ही अत्यंत समाधानी आहोत आणि प्रचंड आनंदित आहोत.

एक काळ आठवतोय, जेव्हा व्यासपीठावर उभं राहून सरळ बोलणंही अवघड होतं; काय बोलावं हेही समजायचं नाही. पण, आमच्या संस्थेने आमच्यातील या न्यूनतेला ताकदीत परिवर्तित केलं. आमचे आदरणीय मोहन सर यांनी प्रत्येक कार्यकर्त्याच्या गुणांना पैलू पाडत, आम्हाला आत्मविश्वासाने सजवलं. आज अशी परिस्थिती आहे की झोपेतून उठवलं तरी कोणत्याही विषयावर बोलायला आम्ही सिद्ध आहोत. ही जी धडाडी, ही जी आत्मभानाची ताकद ती आम्हाला विकास सहयोग प्रतिष्ठानने दिली आहे. वेगाने बदलणाऱ्या जगात दररोज असंख्य संस्था जन्म घेतात आणि काही दिवसांत कोसळतात. पण आम्ही, संकटांनाही संधी मानून, नियोजनबद्ध मार्गाने वाटचाल करत राहिलो. प्रत्येक अडचण आमच्यासाठी शिकण्याची संधी ठरली. संस्था म्हणजे केवळ प्रकल्पांची मोजणी नव्हे, तर माणसांच्या मनात आशा आणि आत्मविश्वास जागवण्याचा ध्यास आहे. ती आहे वाया जाणाऱ्या आयुष्यांना दिशा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न.

विकास सहयोग प्रतिष्ठानने आम्हा कार्यकर्त्यांना समजून घेतलं, आमच्या अडचणींवर प्रेमाने, संयमाने आणि दूरदृष्टीने मात केली. आज आम्ही जे काही आहोत, ते आमच्या संस्थेमुळे आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मा. मोहन सुर्वे सर यांच्या अद्वितीय नेतृत्वामुळे. त्यांच्या कुशल नियोजनामुळे, भक्कम दूरदृष्टीमुळे आणि निष्ठेने आज संस्था अभिमानाने उभी आहे आणि उद्याही यशस्वीपणे वाटचाल करत राहील याचा आम्हाला संपूर्ण विश्वास आहे.अशा दुर्दम्य ध्यासाने, सामाजिक परिवर्तनासाठी संघर्ष करणारी संस्था म्हणजे विकास सहयोग प्रतिष्ठान. संस्थेचा प्रवास म्हणजे केवळ संस्थेची वाढ नव्हे, तर माणसांच्या जीवनात नवचैतन्य आणण्याचा संघर्ष आहे.

विकास सहयोग प्रतिष्ठान – परिवर्तनाची मशाल!

( ३० वर्षांचा प्रेरणादायी प्रवास) विकास सहयोग प्रतिष्ठान   या संस्थेला दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी तीस वर्षे पूर्ण झाली. या तीन दशकांचा प्रवा...